जागतिक आदिवासी दिनास रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

493

अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका) :- दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये कृषीमंत्री दादाजी भुसे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

रायगड जिल्ह्यातील 22 आदिवासी शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. महोत्सवामध्ये या शेतकऱ्यांना 39 प्रकारच्या विविध रानभाज्या प्रदर्शन व विक्रीकरिता ठेवल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने करटोली, सुरण, टाकळा, आळू, अंबुशी, भुई आवळा, भारंगी, कुरडू, कुडा, काटेमाठ, चंदन, बटवा, चाईचा वेल, बहावा, बांबूचे कोंब, रानकेळी यांचा समावेश होता.

कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत रायगड जिल्ह्यामध्ये दि.09 ते 15 ऑगस्ट 2021 च्या कालावधीमध्ये तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे नियोजन केले असून रोहा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.

आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनांवर अवलंबून आहे. त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. रानभाज्या पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्यांचे आरोग्य विषयक महत्त्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागात नागरिकांना होण्यासाठी उत्पादन व विक्री व्यवस्था करून त्यांच्या विक्रीतून आदिवासी शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे, हा मुख्य उद्देश आहे.

या निमित्ताने तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधून जास्तीत जास्त आदिवासी शेतकऱ्यांनी रानभाजी प्रदर्शन, पाककृती करून त्याची विक्री करण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here