
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी दिलेल्या निमंत्रण सोहळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार की नाही? याची चर्चा सर्वाधिक रंगली होती.
मात्र, राज ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्या निमंत्रणाचा आदर राखत शेतकरी कामगार पक्षाच्या रॅलीला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते.
त्यामुळे शेकापच्या व्यासपीठावर एकाचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत दिसून आल्याने पुन्हा एकदा राजकीय भूवया उंचावल्या. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी संजय राऊत आणि राज ठाकरे यांना रॅलीसाठी निमंत्रण दिले होते.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. या सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिल्याने ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील युतीची नांदी आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.