जयंत नाईकनवरे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त; बी. जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक
नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी राज्य शासनाने जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती केली आहे.तर सध्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बदली महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून झाली आहे.नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर (पाटील) हे आता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील.त्यांचा अनुभव मोठा आहे. त्याचप्रमाणे बी. जी. शेखर (पाटील) हे सुद्धा नाशिकला नवे नाहीत. त्यांनीसुद्धा एकेकाळी नाशिकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस अधीक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. दीपक पाण्डेय यांनी लेटरबॉम्बद्वारे राज्यात खळबळ उडवून दिली. राज्यातील महसूल विभागाचे अधिकार कमी करुन ते पोलिस आयुक्तांना देण्यात यावे, अशी खळबळजनक मागणी त्यांनी केली होती.तसेच, हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी पंपचालकांनी नाशिक शहरात संप पुकारला. त्यातच पाण्डेय यांनी खासगी कारणास्तव राज्य सरकारकडे बदलीचा अर्ज केला होता. आता अखेर राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा जयंत नाईकनवरे यांच्याकडे देण्यात आली आहे.




