मुंबई पालिकेचा उपक्रम
मुंबई : जन्म-मृत्यू दाखल्याची नोंदणी वा त्यातील चुकांची दुरुस्ती आता ऑनलाइन माध्यमातून करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. तसेच जन्म-मृत्यू दाखले मराठी, इंग्रजीसोबतच उर्दू आणि अन्य भारतीय भाषांमध्येही देण्यात येणार आहेत.
मुंबईत जन्म वा मृत्यू झालेल्या व्यक्तींचा जन्म-मृत्यू दाखला पालिकेकडून देण्यात येतो. दाखला मिळविण्यासाठी पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यानंतर नियोजित कालावधीत जन्म अथवा मृत्यू दाखला शुल्क स्वीकारून दिला जातो. हे दाखले मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालावे लागतात. तसेच काही वेळा दाखल्यावर नमूद केलेले नाव, पत्ता वा आई-वडिलांच्या नावात चूक होते आणि ही चूक दुरुस्त करण्यासाठी संबंधितांना पुन्हा पालिका दरबारी अर्ज करावा लागतो. नागरिकांचा हा त्रास टळावा यासाठी आता जन्म-मृत्यू दाखले, तसेच त्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाइनवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केली होती. पालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, येत्या १४ दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेकडून २००७ पूर्वी लिखित स्वरूपात जन्म-मृत्यू दाखले देण्यात येत होते. २००७ नंतर संगणकीय दाखले देण्यास सुरुवात झाली. मात्र २००७ पूर्वीचे दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा प्रश्नही धसास लावावा, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.
‘ते’ परिपत्रक पुन्हा जारी करा!
करोना संसर्गामुळे सध्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एखाद्या व्यक्तीचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत्यू दाखला मिळविणे अवघड बनले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी पालिकेने १३ जानेवारी २०१० रोजी जारी केलेल्या परिपत्रकाचा आधार घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.
मृत्यू झालेल्या ६५ वर्षांवरील व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच व्यक्ती अथवा शेजारील ओळखीच्या व्यक्तींनी तयार केलेला पंचनामा सादर करावा, तसेच तरुणाचा मृत्यू झाल्यास स्थानिक पोलीस ठाण्याचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर करावे अशी तरतूद या परिपत्रकात आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नाही. मात्र आता करोनामुळे आणिबाणीची परिस्थिती असून या परिपत्रकात सुधारणा करावी आणि ते नव्याने जारी करावे, अशीही मागणी रईस शेख यांनी केली आहे.