
कर्जत: येथे सोमवारी (ता.२८) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानी चांगलाच धुमाकूळ घातला. मुख्य रस्त्यावर असणाऱ्या कर्जत (Karjat) बसस्थानक परिसरातील तीन दुकाने फोडली. चोरट्यांनी सुमारे ४१ हजार रुपयांची रोकड चोरी (Theft) नेली. यामध्ये पत्रकार गणेश जेवरे यांच्या पुस्तकालयचा देखील समावेश आहे.
कर्जत व बसस्थानक परिसरामध्ये मेनरोडवर पत्रकार गणेश जेवरे यांच्या पुस्तकालयाच्या पाठीमागील बाजूने येऊन छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला व दुकानातील १३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारी असणाऱ्या निखिल लोखंडे यांच्या मेडिकलकडे वळवला. चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानातील आठ हजार रुपयाची रोकड चोरून नेली. यानंतर आपला मोर्चा शेजारीच असणाऱ्या गिरधारी सिंह राजपुरोहित यांच्या स्वीट्सच्या दुकानाकडे वळवला. त्यांच्याही छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत सुमारे वीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
शहरात सकाळीच चोरीची माहिती मिळतात शहरातील अनेक व्यापारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे प्रमुख, पत्रकार आदींनी पाहणी करत पोलिसांनी चोरट्यांचा अटक करीत त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सर्व परिसराची पाहणी करून मुख्य रस्त्या आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेराची फुटेज पाहून पुढील तपासाच्या सूचना दिल्या. चोरी झालेल्या तिन्ही दुकानात नगर येथील ठसे तज्ज्ञ पथकाने देखील भेट दिली.






