
आयपीएल 2025 दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला असून संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत एमएस धोनी आता या हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.
30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात ऋतुराजच्या डाव्या हाताच्या कोपराला तुषार देशपांडेचा चेंडू जोरात लागला होता. त्यामुळे काही क्षण ऋतुराज वेदनेने थेट खाली बसला होता. पण त्यावर पेन रिलीफ स्प्रे मारल्यानंतर आणि गोळी घेतल्यानंतर ऋतुराजने खेळले कायम केले होते. त्याने या सामन्यात अर्धशतकही साकारले.
त्यानंतर ऋतुराज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातही खेळला होता. मात्र त्याला 5 आणि 1 धावच करता आली होती. पण आता त्याची ही दुखापत थोडी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला आता उर्वरित संपूर्ण हंगामालाच मुकावे लागणार आहे.
आयपीएल 2024 पूर्वी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले होते. ऋतुराजच्या नेतृत्वात 2024 मध्ये चेन्नईने 7 विजय आणि 7 पराभव स्वीकारताना पाचवे स्थान मिळवले होते. 2025 मध्ये मात्र चेन्नईची सुरुवात फार खास राहिली नव्हती. त्यांना 5 पैकी 4 सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे चेन्नई सध्या गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर आहे. त्यातच आता ऋतुराजला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. आता पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्वात खेळताना चेन्नई पुनरागमन करणार का हे पाहावे लागणार आहे.





