चिकनचे पैसे मागितले म्हणून ग्राहकाची दुकानात तोडफोड
चिकन खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाला दुकानदाराने पैसे मागितले. या कारणावरून त्या ग्राहकाने दुकानात तोडफोड केली. तसेच दुकानातून एक हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. त्याचबरोबर या ग्राहकाने अन्य ग्राहकांना धमकी दिली.
ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी तीन वाजता नेहरुनगर पिंपरी येथील बारामती ऍग्रो सुपर चिकन सेंटर मध्ये घडली. पक सुरेश मोहिते (वय 30, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत महादेव मच्छिंद्र चौबे (वय 35, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपी दीपक हा नेहरुनगर पिंपरी येथील बारामती ऍग्रो सुपर चिकन सेंटर मध्ये चिकन खरेदी करण्यासाठी आला. चिकन खरेदी केल्यानंतर दुकानदाराने दीपकला पैसे मागितले. या कारणावरून दीपक याने शिवीगाळ करून फिर्यादी दुकानदाराला मारहाण केली. तसेच दुकानातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. चिकन घेण्यासाठी आलेल्या अन्य लोकांना पुढे आल्यास दगडाने मारण्याची धमकी दिली. आरोपी दीपक याने फिर्यादी यांच्या दुकानातील कॅश काऊंटर मधून 1000 रूपये जबरदस्तीने चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.