घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..

    6

    अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.

    जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित एलपीजीचा हॉटेल, ढाबे यांसारख्या व्यावसायिक ठिकाणी अवैध वापर होत असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे आणि शासनाच्या निधीचे मोठे नुकसानही होते आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर तात्काळ ठोस कारवाई करण्यात यावी. अवैध रिफिलिंग आढळल्यास संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करून तिचे परवाने रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    घरगुती गॅसच्या अवैध व्यापारात सहभागी किंवा गैरव्यवहार करणाऱ्या गॅस एजन्सींना देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र तातडीने रद्द करावे. तसेच पेट्रोलियम अधिनियमांतर्गत एजन्सीची साठवणूक आणि विक्रीची परवानगीही तत्काळ रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

    ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना वजन काट्यावर तपासून घ्यावे तसेच लिकेज डिटेक्टरद्वारे गॅस गळतीची खात्री करून घ्यावी. अवैध रिफिलिंगमुळे गॅस गळतीची आणि मोठ्या अपघातांची शक्यता असते. त्यामुळे आपले गॅस सिलेंडर इतरांना देऊ नयेत आणि घरगुती सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी अजिबात वापरू नयेत.

    घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास ती संबंधित कंपनीच्या सेल्स अधिकारी किंवा नोडल अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here