नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) घणसोली (Ghansoli) येथील ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा (Robbery) पडल्याची घटना रविवारी (14 नोव्हेंबर) दुपारी घडली होती. यामध्ये सुमारे दोन किलो सोन्याचे, तर 25 किलो चांदीचे दागिने लुटून नेले होते. घणसोली सेक्टर 7 येथील अंबिका ज्वेलर्समध्ये तीन व्यक्तींनी ज्वेलर्समध्ये प्रवेश करुन पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकला होता.
मात्र, तीन दिवस उलटून सुद्धा पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आरोपी सोने-चांदी असलेली बॅग घेऊन जाताना दिसत आहेत. याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
ज्वेलर्सचे मालक आणि एक कामगार असे दोघेच दुकानात असताना तीन व्यक्ती ग्राहक बनून दुकानात आल्या. यानंतर त्यांनी दुकानाचे शटर बंद करुन दोघांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर ज्वेलर्समधीलच एका खोलीत दोघांचे हातपाय बांधून डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर दुकानातील संपूर्ण ऐवज लुटून तिघांनीही धूम ठोकली.
सुमारे दहा ते पंधरा मिनिटांत त्यांनी संपूर्ण ज्वेलर्सचे लुटून नेले. जाताना त्यांनी शटर बंद केले होते. यादरम्यान, आतमध्ये डांबून ठेवलेल्या ज्वेलर्स मालक आणि कामगारांनी काही वेळाने एकमेकांच्या मदतीने स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर दुकानाबाहेर येऊन त्यांनी दरोडा पडल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दरोडेखोरांनी पळून जाताना दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील काढून नेला होता. यामुळे दुकानातील घटनेची आणि लुटारुंची ठोस माहिती पोलिसांना कळू शकलेली नाही. मात्र, काही अंतरावरील रहिवासी सोसायटीच्या सीसीटीव्हीत लुटीनंतर हातातील पिशवीत ऐवज घेऊन तिघे जण पायी जाताना दिसून आले. त्याद्वारे काही अंतरावरुन ते गाडीने पसार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर भरदिवसा दरोडा टाकून गुन्हेगारांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. आरोपींना पकडण्यासाठी रबाळे पोलीस आणि गुन्हे शाखेने विविध पथके तयार केली आहेत. यापूर्वी पनवेलमध्ये देखील दीड किलो सोने भरदिवसा लुटण्यात आले होते. तेही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.