स्वि त्झर्लंडमध्ये ग्लेशियर फुटून झालेल्या हिमस्खलनात अख्खं गाव वाहून गेल्याची घटना घडलीय. स्विस आल्प्समध्ये ग्लेशियर घसरल्यानं ब्लेंटन नावाचं गाव उद्ध्वस्त झालंय. पर्वतावरून खाली येणाऱ्या ग्लेशियरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर आता ग्लेशियर दुर्घटनेच्या आधीचे आणि नंतरचे फोटो व्हायरल होत आहेत. यात घटना किती भीषण होती हे दिसून येत आहे. जिथं एक सुंदर गाव होतं तिथं आता फक्त ढीग आणि अवशेष उरले आहेत. बर्फाच्या वादळामुळे काही घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत तर काही वाहून गेली आहेत.ब्लेंटन गावात ३०० लोक राहतात. दुर्घटनेबाबत गावकऱ्यांना आधीच इशारा मिळाला होता. त्यामुळे १९ मे रोजीच गाव रिकामं करण्यात आलं होतं. या काळात इतर साहित्य लोकांना हलवता आलं नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीय.
ब्लेंटनच्या महापौरांनी सांगितलं की, जे घडलं ते कल्पनेच्या पलिकडचं होतं. ग्लेशियर तुटून प्रचंड नुकसान जालं आहे. आम्ही आमचं गाव गमावलं पण मनाने खंबीर आहोत. एकमेकांना आधार देऊ आणि यातून उभा राहू. मोठ्या काळरात्रीनंतर दिवस नक्की उगवेल अशी आशा महापौरांनी व्यक्त केली.स्वित्झर्लंडच्या पूर्वभागातील अनेक खेड्यांना ग्लेशियर तुटून आपत्ती ओढावण्याचा धोका आहे. ब्लेंटन हे काही पहिलं गाव नाही जे ग्लेशियरच्या धोक्यामुळे रिकामं केलं गेलं. २०१७ मध्ये बोंडो गावात ८ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता तर अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती.
स्वित्झर्लंडमधील ग्लेशियरबाबत अलिकडच्याच एका संशोधतनात धोक्यांबाबत इशारा देण्यात आला आहे. जागतिक तापमानवाढ ही १.५ अंश सेल्सिअसच्या आत नाही राहिली तर हे ग्लेशिअर्स वितळतील आणि यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.




