ग्रामीण भागातील उद्योगांना प्राधान्याने वीज देण्याचे नियोजन – डॉ. नितीन राऊत

571


• माडगी येथील 33/11 के.व्ही उपकेंद्राचे लोकार्पण
भंडारा, दि.28: शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. महाविकास आघाडी शासनाकडून जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची ग्वाही देतो. राज्यातील ग्रामीण भागात शेतीसह औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामीण भागात उद्योग उभारावे लागतील. उद्योगासाठी वीज आवश्यक आहे. त्या दिशेने शासनाच्या वतीने नियोजन सुरू आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.


तुमसर तालुक्यातील माडगी येथील 33/11 के.व्ही उपकेंद्राच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बंडू वासनिक, अधिक्षक अभियंता भंडारा राजेश नाईक, भंडारा महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड, माडगीचे संरपंच गौरीशंकर पंचबुधे, प्रेमसागर गणविर तसेच पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भंडारा व गोंदिया हे जिल्हे मानव विकास निर्देशांकामध्ये मागे पडलेले आहेत. या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबध्द आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे अनेक विकास कामे मंदावली आहेत. या काळातही अनेक दिवसांपासून माडगी परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता महावितरण विभागाच्या वतीने माडगी येथे 33/11 के.व्ही. उपकेंद्र निर्मिती झाली असून त्याचा लोकार्पण करतांना मला आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
माडगी उपकेंद्रामुळे जवळपासच्या 10 गावातील 1 हजार शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी व औद्योगिक तसेच इतर 4 हजार ग्राहकांना गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा मिळण्यास मदत होईल. यामध्ये कृषी पंपासाठी एक वेगळा फिडर उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा उपलब्ध होईल. शेती व उद्योगाच्या विकासातून गावाचा विकास होतो. नव्या उद्योगांसाठी गांभीर्याने लक्ष घालून माडगी येथील उपकेंद्रात तीन फिडर दिलेले आहेत. माडगी येथील उपकेंद्राच्या माध्यामातून आपली विकासाची वाटचाल चालू राहील, असे त्यांनी सांगितले.
महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. माडगी येथे 132 के.व्ही. उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून 16 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मर व्दारे 11 के.व्ही. स्वीचींग स्टेशनच्या माध्यमातून जवळपास 10 गावांना वीज पुरवठा होत होता. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना अखंडीत व योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळावा यासाठी पूर्व विदर्भीय योजनेअंतर्गत माडगी येथे 33/11 के.व्ही. उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेद्रास उभारणीसाठी जवळपास 4.5 कोटी रुपये खर्च झालेला आहे, असे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. नागरिकांनी वीज बिल भरा व थकबाकी मुक्त व्हा, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती फटे व रेशमा नंदनवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांनी मानले.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here