
धाराशिव : धाराशिवमध्ये मुसळधारपावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसाने शेतातील पिकं हिरावली आहेत. तर अनेकांचं शेत वाहून गेलं आहे. या भयानक पावसात जनावरंदेखील मेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. पण भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात वेगळा प्रकार बघायला मिळाला. या गावात शेकडो जनावरे वाहून गेले आहेत. त्यामुळे मंत्री Girish Mahajanगावात पाहणीसाठी आल्यानंतर शेतकरी उद्विग्न झाले.
चिंचपूर ढगे गावच्या शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा थांबवला. यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले. जनावर मेली आहेत. तात्काळ मदत द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. “मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो. मी पैसे घेऊन आलो नाही”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे जाणं पसंत केलं.
गिरीश महाजन काय म्हणाले?गिरीश महाजन यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “हा मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मदतीबाबत ठरवतील. नुकसान खूप मोठं आहे. याची जाणी आहे. मी दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसोबत बोलत आहे. मी दौऱ्यावरच आहे. काल रात्री बीडला होतो. काल जळगावला होतो, आज धाराशिवला आलो आहे. पुढे सोलापूरलाही जातोय”, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.