कोविड सेंटर करण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध
अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावरील गागरे हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे.
याबाबत तहसीलदार फसियोद्दिन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन आता खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू करत आहे.
बिरोबानगर येथील गागरे हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, परिसरातील नागरिकांनी त्याला विरोध केला आहे.
हॉस्पिटलच्या आजूबाजूला घरे आहेत. दाट लोकवस्ती आहे. या भागात वाहनांच्या पार्किंगसाठी आणि विलगीकरण कक्षासाठी अडचण आहे. कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे, तर परिसरात राहणाऱ्या लोकांना लागण होण्याची दाट शक्यता आहे. शहरात लोकवस्तीपासून दूर मोठे हॉल आहेत, मंगल कार्यालये आहेत. तेथे कोविड केअर सेंटर सुरू करावे, असे निवेदनात म्हटले.
निवेदनावर विष्णू ताठे, प्रसाद गाडे, चंद्रमोहन जग्गी, बाबासाहेब येवले, महावीर गुंदेचा, स्नेहलता शिरसाट, रावसाहेब वराळे, किशोर गुंदेचा, डाॅ. अण्णासाहेब पवार, डॉ. मधुसूदन भागवत, बंडेशकुमार शिंदे, मनोज कुलकर्णी, रूपाली सरोदे, प्रवीण धिमते, प्रताप भांड, अमोल धनवटे, गालीब शेख, जोगिंदरसिंग कथुरिया, विजय करपे, किरण भालेकर, रवींद्र करपे, देवेंद्र झिने, कैलास शेळके आदींच्या सह्या आहेत.