ठाणे : महापालिकेच्या साकेत येथील ग्लोबल कोविड रुग्णालयामध्ये तीन बोगस डॉक्टर काम करीत असल्याच्या चर्चेने सोमवारी शहरात एकच खळबळ उडाली. या चर्चेची महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तात्पुरते कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. साकेत येथील ग्लोबल इम्पॅक्ट हबच्या इमारतीत सुमारे एक हजार खाटांचे हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात सुरुवातीला पुरेसे डॉक्टर उपलब्ध नव्हते. डॉक्टरांच्या भरतीची जाहिरात सातत्याने देऊनही त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने एका खासगी संस्थेच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये डॉक्टरांची नेमणूक केली होती. रुग्णालयात पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा करोनाबाधित रुग्णांना फायदा होत असून या उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत होत आहेत. असे असतानाच या रुग्णालयामध्ये तीन बोगस डॉक्टर काम करीत असल्याची चर्चा सोमवार सकाळपासून शहरात सुरू आहे.
या चर्चेची महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असून त्यात कुणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


![दि.१५/०३/२०२२ रोजी अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी नवीन मुख्य ११०० एम.एम.[PSC] जलवाहिनी बाभळगाव जवळ लिकेज झाल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत](https://maha24news.com/wp-content/uploads/2022/03/download-24-150x150.jpeg)




