मागील सहा महिन्यांपासून घरापासून दूर राहून करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचं संसर्ग झाल्यानं निधन झालं. आरिफ खान असं या रुग्णवाहिका चालकाचं नाव असून, मार्चपासून ते करोना रुग्णांना रुग्णालयात सोडण्याचं तसंच मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं कर्तव्य बजावत होते. या कोविड योद्ध्याच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्विट करून खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
आरिफ खान मागील सहा महिन्यांपासून पत्नी व आपल्या चार मुलांपासून दूर होते. २४ तास कार्यरत असणाऱ्या व करोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर ते चालक म्हणून सेवा बजावत होते. कुटुंबीयांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्यानं खान रुग्णवाहिकेतच झोपायचे. फोनवरून कुटुंबीयांच्या संपर्कात राहायचे. खान यांनी मार्चपासून करोनामुळे मरण पावलेल्या २०० रुग्णांवर अंत्यसंस्कार केले होते. ४८ वर्षीय आरिफ खान यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. त्यांना करोनाचा झाल्याचं निदान झालं होतं. त्याच्यावर दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत असताना आरिफ यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत होते. आरिफ खान हे मागील २५ वर्षांपासून शहीद भगत सिंग सेवा दलासोबत काम करत होते. ते मोफत रुग्णवाहिका पुरवण्याचं काम करायचे. २१ मार्चपासून आरिफ खान करोना रुग्णांची रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा करत होते. आरिफ यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“करोना महामारी विरोधात सुरू असलेल्या अभियानातील समर्पित योद्धा दिल्लीचे आरिफ खान यांच्या मृत्यूचं वृत्त ऐकून दुःखी आहे. महामारीच्या या काळात त्यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून मृतांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात सहकार्य केलं. अशा समर्पित भावनेनं काम करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू समाजाची हानी आहे,” असं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
खान करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करत. त्याचबरोबर करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास कुणीही हजर नसल्यास ते स्वतः अंत्यसंस्कार करत, असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं.




