कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन प्रकरणी गावस्तरापर्यंत आता विविध पथकांमार्फत कारवाई करा: निवासी उपजिल्हाधिकारी

480

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन प्रकरणी गावस्तरापर्यंत आता विविध पथकांमार्फत कारवाई करा: निवासी उपजिल्हाधिकारी

अहमदनगर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर आता जिल्ह्यात स्थानिक प्रशासनामार्फत कडक कारवाई कऱण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले आहेत. सर्व यंत्रणांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावी. ग्रामस्तरापर्यंत विविध पथकांमार्फत कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे, जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजूरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तींविरुद्ध कारवाईची मोहिम तीव्र कऱण्यात आली आहे. तालुका प्रशासनाने आता ही मोहिम अशाच प्रकारे कायम ठेवून संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत, तो भाग प्रतिबंधित करुन त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यात याव्यात. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी सूचना त्यांनी केली. काही तालुक्यात विविध ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. स्थानिक ग्रामस्तरीय अधिकारी, गावपातळीवरील पथके याठिकाणी कार्यरत करावीत. मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यापूर्वीच त्याची माहिती संबंधितांनी प्रशासनाला दिली पाहिजे. स्थानिक गावांचे सरपंच, इतर पदाधिकारी यांनीही याकामी पुढाकार घेऊन गर्दी टाळण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी अतिरिक्त बेडसची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी कऱण्यात येत आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल, यादृष्टीने पाठपुरावा करावा. वेळेत ते काम पूर्ण करुन घ्यावे. असे त्यांनी स्पष्ट केले.
संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेता कोविड केअर सेंटर अद्यावत असतील याबाबत तालुकायंत्रणांनी दक्षता घ्यावी. रुग्ण वाढ अशीच राहिली तर ही सेंटर्स सुरु करावी लागणार आहेत. तेथील औषधसाठा, बेडस व्यवस्था याची तयारी करुन ठेवण्याची सूचना यावेळी नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी दिली. तर रुग्णालयांनी दिलेल्या बिलांसंदर्भात आलेल्या तक्रारी संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी तातडीने मार्गी लावाव्यात, असे उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here