कोविडचे निर्बंध पाळून गणेशोत्सव आनंदाने साजरा करू
-पालकमंत्री कु.आदिती तटकरे
अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका) :- कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी कोविडचे निर्बंध पाळून गणेशोत्सव आनंदाने साजरा करू या, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
” गणेशोत्सव 2021 पूर्वतयारी व जिल्हा शांतता समितीची आढावा बैठक आज नियोजन भवन बैठक सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा शांतता समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, जिल्हा परिषद, राज्य परिवहन अशा विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी गणेशोत्सव 2021 च्या तयारीच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, कोकण रेल्वे, मेरीटाईम बोर्ड, रस्ते वाहतूक अशा विविध विभागांनी केलेल्या तयारीची सविस्तर माहिती जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांना दिली.
जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष बैठक घेतल्याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे आभार मानले तसेच या सदस्यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत, ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे सुरू करण्याबाबत, कोविडची संभाव्य तिसरी लाट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची कोविड तपासणी व लसीकरण, इत्यादी विषयांबाबत चर्चा केली. त्यावर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधित शासकीय विभागांकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत समिती सदस्यांना माहिती दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी ही प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले.
बैठकीच्या सुरूवातीस अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीचा हेतू तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने केलेल्या तयारीबाबत उपस्थित सर्वांना माहिती दिली.
शेवटी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सर्वांचे आभार मानून येणारा गणेशोत्सव शासनाने नेमून दिलेले निर्बंध पाळून, स्वत:च्या व इतरांच्याही आरोग्याची काळजी घेत उत्साहाने साजरा करू, असे आवाहन केले.
0000




