कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी

417

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

• टास्क फोर्स, खासगी डॉक्टरांची बैठक

वाशिम, दि. २६ (जिमाका) : कोरोना संसर्गाची तिसऱ्या लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने सज्ज होणे आवश्यक असून ऑक्सिजन, औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २६ जुलै रोजी झालेल्या जिल्हा टास्क फोर्स, कोविड हॉस्पिटल चालविणारे खासगी डॉक्टर यांच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्यासह जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य, कोविड हॉस्पिटल चालविणारे खासगी डॉक्टर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आलेल्या अनुभवांच्या आधारे आरोग्य यंत्रणेने आवश्यक सज्जता करणे गरजेचे आहे. शासकीय व खासगी क्षेत्रातील वैद्यकीय सुविधा आणखी सक्षम करण्याची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. विशेषतः ऑक्सिजनची उपलब्धता आणि कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक औषधीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. सुदैवाने जिल्ह्यात उभा राहत असलेल्या शासकीय व खासगी ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. तरीही प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा, सेन्ट्रल ऑक्सिजन लाईन, व्हेंटीलेटर यासह इतर उपकरणे व मनुष्यबळ याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार सज्जता ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे आवश्यक असून जिल्ह्यात कोणत्याही गावात अथवा परिसरात कोरोना बाधितांची वाढ होत असल्याचे लक्षात आल्यास तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात. तेथील लसीकरण वाढवून बाधितांचा शोध घेवून त्यांचे अलगीकरण करावे. खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सुद्धा या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात अपेक्षित असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली. दुसऱ्या लाटे दरम्यानची एकाच दिवशीची सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण संख्या लक्षात घेवून त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here