Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बातमधून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन रिसर्च सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी स्वयंशिस्त महत्वाची असल्याचं देखील मोदी यांनी म्हटलं आहे. सोबतच यावर्षी देखील मी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करणार असून त्यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे, असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, आपली सामुहिक ताकत कोरोनाला नक्की पराजित करेल. याच विश्वासानं आपल्याला 2022मध्ये प्रवेश करायचा आहे. आता जो नवा Omicron variant आला आहे त्यावर आपले संशोधक रिसर्च करत आहेत. रोज नवीन डेटा येत आहे, त्यावर सल्ले, सूचना घेतल्या जात आहेत. अशात आपली स्वयंशिस्त आणि सजगता या विषाणूविरुद्धची मोठी ताकत आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
काल 12 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, बुस्टर डोसबाबत मोठी घोषणा केल्यानंतर आज मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल रात्री देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली होती.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 84 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. आज 26 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.