मुंबई : “कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई आणि नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची चिंता सतावत आहे. असं असताना मोदी सरकार मात्र परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भूमिकेला आमचा विरोध आहे,” असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं
यावेळी त्यांनी शुक्रवारी (28 ऑगस्ट) काँग्रेस जेईई-नीट परीक्षेविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचीही घोषणा केली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोठ्या संकटात ढकलत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. असं असताना परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देण्यास लाखो विद्यार्थ्यांना सक्ती करणे म्हणजे या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही अजून झालेली नाही. जेईई परिक्षेसाठी तब्बल साडेआठ लाख विद्यार्थी बसलेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देण्यास एकत्र आल्यास कोरोना संक्रमणाची भीती नाकारता येत नाही.”
“एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे बिहार, आसाममध्ये गंभीर पुरस्थिती आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडणं हा त्यांच्यावर मानसिक दडपण आणण्याचा हा प्रकार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीतही या परीक्षा घेण्यास विरोध करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे,” असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.
“राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जेईई-नीट परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन”
बाळासाहेब थोरात म्हणाले, “खासदार राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भविष्याची चिंता व्यक्त केली आहे. तसेच या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे. एसएसयुआयनेही केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिलेला आहे. प्रदेश काँग्रेसही केंद्र सरकारच्या या मनमानी व हटवादी भुमिकेच्या विरोधात शुक्रवारी (28 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.”