कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण, एका दिवसात 56 टक्के वाढ

381

नवी दिल्ली – वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 29 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. 

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात तब्बल 56 टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (6 जानेवारी) देशात 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,876 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,85,401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,43,41,009 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,630 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 797 आणि दिल्लीत 465 रुग्ण आहेत. ओमायक्रॉनच्या 2,630 रुग्णांपैकी 995 जण बरे झाले आहेत. देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. नव्या रुग्णांपैकी 66.97 टक्के रुग्ण या पाच राज्यामधील आहेत. तर फक्त महाराष्ट्रात 29.19 टक्के रुग्ण आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळचा समावेश आहे. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. 

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट आली असून दिल्लीत पाचवी लाट आली आहे. आज जवळपास 10,000 नवे रुग्ण आढळतील आणि पॉझिटिव्ह रेट 10% असेल असं म्हटलं आहे. संपूर्ण देशात कोरोना अत्यंत वेगाने पसरत आहे पण आता तो खूपच सौम्य झाला आहे. त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. होम आयसोलेशन आवश्यक आहे असं देखील सत्येंद्र जैन यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये आत्तापर्यंत कोविड रुग्णांसाठी 10% बेड होते पण आता त्यांना 40% राखीव ठेवावे असं सांगितलं आहे. सरकारी रुग्णालयातील सुमारे 2 टक्के बेड भरलेले आहेत असं देखील जैन यांनी सांगितलं. दिल्लीमध्ये कोरोना चाचण्या करण्याची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. याआधी दिवसाला 50 ते 60 हजार टेस्ट होत होत्या. पण आता दररोज तीन लाख टेस्ट करण्याची क्षमता आहे. तसेच आवश्यक ती पावलं उचलली जात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here