
कर्जत: अंतरवाली सराटी (जालना) येथील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांवर केलेल्या लाठीमार घटनेचा निषेधार्थ कोपर्डी (Kopardi) (ता.कर्जत) येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज (ता.५) पासून प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत भैरवनाथाच्या मंदिरासमोर भजन-कीर्तन करीत साखळी उपोषण सुरू केले आहे. यासह कोपर्डीच्या निर्भया (Nirbhaya) हत्याकांड घटनेतील मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची आणि दुष्काळ निवारण उपाययोजनेच्या मागणी यावेळी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना त्यांच्यावर अमानुषपणे पोलीस विभागाकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये महिलांसह आंदोलकांना गंभीर मारहाण झाली. या घटनेचा कोपर्डीच्या ग्रामस्थांनी निषेध करीत मराठा आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोपर्डी ग्रामस्थांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाज्याच्या अनेक नेत्यांनी १९८० पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी केलेली आहे. १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथील निर्भया हत्याकांडानंतर मराठा समाज ३५० वर्षानंतर लाखोच्या संख्येने मोर्च्याच्या निमित्ताने एकत्र आला. यामध्ये मराठा सामाजाने अनेक मागण्या शांततेच्या मार्गाने मांडल्या. मात्र, त्यास सरकारने अनेक वेळा खोटी आश्वासने देत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले.
अंतरवाली सराटी (जालना) येथे मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजाचे उपोषण सुरू आहे. त्या ठिकाणी आंदोलकांवर झालेल्या भ्याड हल्याची चौकशी करीत दोषी असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. यासह कोपर्डी निर्भया हत्याकांडाचा निकाल लागून सहा वर्षे झाले तरी सरकार यामध्ये हलगर्जीपणा होत असून तिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच कर्जत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. कर्जत तालुक्यात पावसाच्या अल्प प्रमाणामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होत तात्काळ पाण्याचे टँकर चालू करावे. जनावरांसाठी चारा छावण्या चालू करण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी साखळी उपोषण सुरू केले असून यामध्ये कोपर्डीकर ग्रामस्थांसह विद्यार्थिनी देखील सहभागी झाले आहेत.
आंदोलनस्थळी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, महसूल मंडळ अधिकारी धुलाजी केसकर, तलाठी मनसुख दरेकर यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यासह आमदार रोहित पवार यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्त्याशी चर्चा करीत संवाद साधला.