मनोरुग्ण युवक सुखरुप आईच्या ताब्यात ; कोतवाली पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी:
अहमदनगर: मनोरुग्ण युवकाचा शोध घेऊन तीन तासाच्या आत त्या युवकाला सुखरुप आईच्या स्वाधीन करण्याची कौतुकास्पद कामगिरी कोतवाली पोलीसांनी केली आहे.
याबाबत सजलेली माहिती अशी की, दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाणे अंमलदार यांना फोनव्दारे माहीती मिळाली की, एक मनोरुग्ण मुलगा आदित्य नवनाथ धनवे (वय १८) हा त्याची आई माया नवनाथ घनवे (वय ४०, रा. बडेच्यावडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर) यांच्याबरोबर मानसदीप मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्र करंदीकर हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन आल्या होत्या.
यानंतर माया घनवे या आपल्या आदित्यास परत घरी जाणेकरीता माळीवाडा बसस्थानक येथे आल्या. या दरम्यान माझा मुलगा पाणी पिऊन येतो, असे सांगून गेला व त्यानंतर परत तो बराच वेळ न आल्याने त्याचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता मिळून आला नाही, त्यानंतर महिलेने त्यांचे नातेवाईकास फोन लावून बोलवले असता त्यांनी लगेच कोतवाली पोलीस ठाण्यात फोन करून मनोरुग्ण युवक हा हरवला असल्याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी कोतवाली पोलीस ठाणे अंमलदार पोना भारत इंगळे यांनी तात्काळ या घटनेची पोनि संपतराव शिंदे यांना माहिती दिली. पोनि श्री शिंदे यांनी तात्काळ पोसई गजेंद्र इंगळे, पोकॉ अनुप झाडबुके, पोकॉ शरद धायगुडे यांचे पथक बनवून मनोरुग्ण युवकाचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.
कोतवाली पथकाने तीन तासाच्या शोध मोहिमेत नातेवाईकांच्या मदतीने मनोरुग्ण आदित्य या युवकास शेंडी बायपास येथून ताब्यात घेतले.
यानंतर आदित्य याला त्याच्या आईकडे सुखरुप स्वाधीन केले.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागिय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संपतराव शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई गजेंद्र इंगळे, पोकॉ अनुप झाडबुके, पोकॉ शरद धायगुडे व शहर वाहतुक शाखेचे पोहेकॉ बीएस. लवांदे यांच्या विशेष पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.




