कॉर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर…!
, मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा…!
मुंबई- बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुज पार्टी मध्ये आमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून अटक होती. मुंबई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला नव्हता. त्यामुळे आर्यनच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
यावर सलग दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर आज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज आणि मूनमून धमेचा अशा तिघांना अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. एक प्रकारे हा शाहरुख खानच्या परिवाराला मोठा दिलासा असून गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेल्या आर्यनची आता सुटका होणार आहे.
आज जामीनाची पूर्तता केल्यानंतर आज किंवा उद्या त्याची ऑर्थर रोड कारागृहातून जामिनावर मुक्तता होईल. आज उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केलेला असताना काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एनसीबी कडून आर्यन खान आणि त्याच्या दोन मित्रांच्या जामिनावर मोठा विरोध करण्यात आला. आर्यन खान हा नियमित अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचं एनसीबीचे म्हणणं होतं. हा गुन्हा केवळ अमली पदार्थ सेवनाचा नसून अमली पदार्थ बाळगणे याबद्दलचा आहे असा युक्तिवाद करतानाच अरबाज त्याच्याकडे अमली पदार्थ सापडल्याचा दावा केलेला होता. आर्यन खान हा सुद्धा या कटातील महत्त्वाचा भाग आहे असे एनसीबी चे म्हणणे होतं. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केलेला आहे . शाहरुख खान आणि त्याच्या परिवारासाठी हा मोठा दिलासा असल्याचं माणण्यात येत आहे.