के.के.रेंज संदर्भात खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार; खासदार विखेंचे स्पष्टीकरण

    956

    अहमदनगर : केके रेंज भूसंपादनासंदर्भातील खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार असल्याचे स्पष्टीकरण नगरचे खा. डॉ. सुजय विखे यांनी दिले आहे.

    यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, के.के रेंज अर्थात खारे कर्जुने रेंजसंदर्भात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. के. के रेंजसाठी भूसंपादन होणार नसल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांना देण्यात आल्याचे समजते. सगळ्यात प्रथम या प्रश्नासंदर्भात आपण माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सोबत घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटून विस्तृत चर्चा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथांबाबत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना अवगत केले आहे. केवळ संरक्षणमंत्री नव्हे तर देशाचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांच्याशीदेखील चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्याची विनंती केली आहे. नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांची संवाद साधून त्याबाबतची मते जाणून घेतल्यानंतरच कुठल्याही प्रकारचा निर्णय करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री महोदयांनी दिले होते, असे सांगून डॉ. विखेंनी सांगितले की, के.के. रेंजच्या जमिनी संपादित होणार आहेत की नाहीत तसेच त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयीन लढा उभारण्याचीसुद्धा तयारी केली आहे व हे मी वारंवार जनतेला सांगितले आहे.या प्रश्नासंदर्भात आपण राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यातील 23 गावांमधील शेतकऱ्यांबरोबर मागील महिन्यात संवाद साधला होता. 
     
    नुकतेच माजी कृषिमंत्री शरद पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संरक्षण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर के.के.रेंजसाठी जमीन संपादित होणार नसल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये छापून आल्याचे समजले. याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक खुलासा व माहिती कागदपत्रांच्या आधारे आपण लवकरच संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मांडू व के.के.रेंज जमिनीचे संपादन होणार की नाही, याबाबतचा संभ्रम दूर करू, असे खा.डॉ. विखे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here