
अहिल्यानगर-जुन्या कौटुंबिक वादातून चौघांनी महिलेला मारहाण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास केडगाव उपनगरात घडली. 27 वर्षीय पीडितेवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबावरून तिच्याच नात्यातील चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी असलेली त्याची दोन मुले व जावई पसार आहेत. संशयित आरोपीच्या घरातील मुलीचे पीडितेच्या भावाशी लग्न झाले होते.
मात्र, ती पीडितेच्या घरात नांदली नाही. तेव्हापासून पीडित व संशयित आरोपींच्या कुटुंबात वाद सुरू आहेत. त्यावरून या आधीही मारहाण झाली होती. याच जुन्या वादातून मुख्य संशयित आरोपी व त्याची दोन मुले व त्यांचा जावई या चौघांनी पीडितेच्या घरी तिचा पती घरात नसताना घुसून लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर दौघांनी तिला धरून ठेवले व एकाने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक अमोल भारती यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीला अटक केली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू असून अधिक तपास् सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.





