केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत महत्त्वाचा बदल: जीवाला असलेला धोका लक्षात घेत सुरक्षा अपग्रेड .

नवी दिल्ली: केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राणे यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेत त्यांची सुरक्षा अपग्रेड करून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत अधिकृत सूत्रांकडून आज माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गेल्या डिसेंबर महिन्यात वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफचे सशस्त्र कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

आता ही सुरक्षा वाढवण्यात आली असून राणे यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या माहितीला सीआयएसएफचे उपमहानिरीक्षक आणि मुख्य प्रवक्ता डॉ. अनिल पांडेय यांनी दुजोरा दिला.

राणे यांना झेड सुरक्षा मिळाल्याने आता राणे देशात कुठेही दौऱ्यावर गेले तर त्यांच्याभोवती सहा ते सात सशस्त्र कमांडोंचे सुरक्षाकडे असणार आहे. नारायण राणे यांच्या सुरक्षेचा अलीकडेच आढावा घेण्यात आला. त्यातून जी माहिती उपलब्ध झाली त्या आधारे राणे यांना असलेला धोका लक्षात घेत केंद्रीय यंत्रणांनी राणेंची सुरक्षा वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार नारायण राणे यांना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना सीआयएसएफची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान, नारायण राणे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष सातत्याने उफाळून येत असतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राणे यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली होती.

त्याच दरम्यान, राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी उग्र निदर्शने केली होती. या सगळ्या घटना लक्षात घेता राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here