कृषिपंपांना मिळणार दिवसा वीज पुरवठा;

1190

कृषिपंपांना मिळणार दिवसा वीज पुरवठा; 28 विद्युत वाहिन्या सौरऊर्जेवर कार्यान्वित

नाशिक परिमंडळातील सौर निर्मिती प्रकल्प

अहमदनगर : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक परिमंडळात विविध ठिकाणी साकारलेल्या एकूण ६० मेगावॅटच्या सौरप्रकल्पातून एकूण २८ कृषी विद्युत वाहिन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील सौर ऊर्जेवर सुरु करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार कार्यान्वित करण्यात आलेल्या राज्यातील ५० कृषिवाहिन्यांमध्ये नाशिक परिमंडलातील २८ तथा अहमदनगर मंडळातील ४ कृषी वाहिन्यांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास असा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. रात्री अपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ ही योजना हाती घेतली आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांपासून जवळ शासकीय अथवा खाजगी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

यानुसार नाशिक जिल्ह्यात ५ ठिकाणी ५ मेगावॉटचे २ म्हणजे एकूण १० मेगावॉटचे तर अहमदनगर जिल्ह्यात १ ठिकाणी ५ मेगावॉटचे २ असे एकूण ६ प्रकल्प उभारण्यात आले असून असून त्याची स्थापित क्षमता ६० मेगावॅट इतकी आहे. या सौर प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणच्या नजीकच्या उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या कृषी वाहिन्यांना दिवसा मिळणार आहे.

यामध्ये दिवसा मिळणाऱ्या वीज वेळेचे तीन टप्पे आहेत, यामध्ये सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत, सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेचा समावेश असेल.
यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील टेम्भे उपकेंद्रातील ६ , मालेगाव तालुक्यातील टिंगरी विद्युत उपकेंद्रातील ५, नांदगाव तालुक्यातील वाहेलगाव विद्युत उपकेंद्रातील ४, येवला तालुक्यातील राजापूर उपकेंद्रातील ४, देवळा तालुक्यातील दहिवड उपकेंद्रातून ५ तर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा विद्युत उपकेंद्रातील४ कृषी विद्युत वाहिन्याचा समावेश आहे. आता या कृषी विद्युत वाहिनीवरील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागणार नाही.

नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंते रमेश सानप आणि संतोष सांगळे यांनी कार्यान्वित करण्यात आलेल्या कृषिवाहिन्यांवरील प्रातिनिधिक स्वरूपात ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज पुरवठा दिवसा सुरूं झाल्याबद्दल त्यांनी प्रतिसाद दिला आहे. यासाठी नाशिक परीमंडळातील महावितरण व महापारेषणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here