कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी 25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
पुणे : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण बाहेर काढल्यावर हडबडलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला वादात ओढले आहे. पण आपण असल्या धमक्यांना घाबरत नाही, रस्ते विकासासाठी आपण राबवलेल्या कल्पक प्रकल्पाची खुशाल चौकशी करा, असे प्रत्युत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी अभ्यास करून हसन मुश्रीफ यांचा आर्थिक घोटाळा बाहेर काढला व संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली. आता मुश्रीफ यांनी चौकशीला सामोरे जावे. त्यांनी काही गैर केले नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. पण ते धमक्या देत आहेत. त्यांनी किरीट सोमय्या यांना खटला दाखल करण्याची धमकी देतानाच आपल्यालाही वादात ओढले आहे.‘खुशाल चौकशी करा’त्यांनी सांगितले की, आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हॅम हा रस्ते विकासाचा अनोखा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे राज्यात चांगली रस्तेबांधणी झाली व त्या प्रकल्पांची उद्धाटने करून महाविकास आघाडी सरकारचे नेते श्रेय घेत आहेत. आता किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर अचानक हसन मुश्रीफ आपण राबवलेल्या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून चौकशीची धमकी देत आहेत. आपण असल्या धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी करा.पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गेले 19 महिने हसन मुश्रीफ यांना या हॅम प्रकल्पाबद्दल कोणतेच प्रश्न पडले नाहीत. पण त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार झाल्यानंतर ते रस्ते प्रकल्पाच्या चौकशीबद्दल बोलत आहेत.‘दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांना आता मुश्रीफांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांवर 100 कोटीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. तसंच चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना खोचक सवाल केलाय. दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.हॅब्रीड अम्युनिटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष 60 टक्के आणि 40 टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अम्युनिटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही. मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी 25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.