वर्धा : महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला (Kalicharan Maharaj ) वर्ध्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणी 14 जानेवारी रोजी होणार आहे.
कालीचरण महाराजाला आज सकाळी वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कालीचरण महाराजाला पोलीस कोठडी देण्यात यावी ही पोलिसांची मागणी फेटाळून लावत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कालीचण याच्या वकिलांनी त्याला जामीन देण्यात यावा असा अर्ज न्यायालयात केला. त्यावर दुपारनंतर सुनावणी झाली. यावेळी पुढील सुनावणी 14 तारखेला होईल असे न्यायालयाने सांगितले.
कालीचरण महाराजाला वर्धा पोलिसांनी आज ट्रान्झिट रिमांडवर छत्तीसगडमधून वर्ध्यात आणलं होतं. त्यानंतर त्याला वर्ध्यातील न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
रायपूरमधील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कालीचरण महाराजाला मध्य प्रदेशातील खजुराहोमधून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर महाराष्ट्रातही गुन्हा दाखल असल्यानं त्याचा ताबा आता महाराष्ट्र पोलिसांनी घेतला आहे.
“मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी 1947 मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज याने केले आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





