काँग्रेस उद्या विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार, कोण होणार अध्यक्ष?

702

मुंबई : विधानसभेचा आखाडा आरोप प्रत्यारोपांनी गाजत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांना वेध लागलेत ते विधानसभा अध्यक्षपदाचे. सोमवारी त्याची निवडणूक आहे. पण अजूनही सत्ताधाऱ्यांनी स्वत:चा उमेदवार दिलेला नाही. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे आणि त्यामुळे ते कुणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. तीन एक नेत्यांची नावं चर्चेत आहेत पण शेवटी कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्याबाबत भाष्य केलंय. विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेस हायकमांड दिल्लीतूनच घोषीत करेल असं पटोले म्हणालेत. सोमवारी निवडणूक आहे. याचाच अर्थ पुढच्या बारा तासात काँग्रेसकडून ह्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणे अपेक्षीत आहे आणि ती उद्या संध्याकाळपर्यंत होईल अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची माहिती आहे. राज्यपालांनाही याची माहिती दिल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. आज काँग्रेसकडून करण्यात आलेल्या मोठ्या बदलानंतर आता नितीन राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नितीन राऊत यांना काँग्रेससं एससी सेलमधूल हटवलं आहे. एक पत्रक जारी करत त्यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आलं असून त्यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे. या बदलामुळे नितीन राऊत यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसडे देण्यात आले आहे. काँग्रेसकडून आधी नाना पटोलेंना अध्यक्ष करण्यात आले होते, मात्र नाना पटोले यांचे नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी ठरल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर अध्यक्ष कोण होणार? हे ठरत नसल्याने बराच काळ हे पद रिक्त होतं. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या  विधानपरिषदेचे निकाल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर भाजप आता महाविकास आघाडी सरकारला विधानसभा अध्यक्षपदावरूनही आव्हान देत आहे. विधान अध्यक्षपदासाठी मतदान गुप्त पद्धतीने घ्या, आवाजी पद्धतीने नको, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. गुप्त मतदान घ्यायला सरकार का घाबरत आहे? त्यांना त्यांच्या आमदारांवर विश्वास राहिला नाही का? असाही सवाल विचारत भाजप महाविकास आघाडीला डिवचत आहे.

नगरपंचायती आणि भंडारा, गोंदिया जिल्हापरिषदेतील ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या आणि आता खुल्या झालेल्या जागांवर काँग्रेस ओबीसी उमेदवार देणार, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या जागा खुल्या होऊन त्यावर 18 जानेवारीला निवडणूक होत आहे. 28 तारखेला अर्ज भरले जाणार आहेत. या सर्व जागांवर ओबीसी उमेदवार काँग्रेस देणार आहे आणि ओबीसींवर जो अन्याय झाला तो दूर करणार अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

चंद्रकात पाटील यांच्या विधानावर बोलताना ते दर महिन्याला मुख्यमंत्री बनत होतेच, आता अडीच वर्षावर का आले ते विचारलं पाहिजे, हा हताशपणा आहे, त्यातून ते अशी वक्तव्य करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. भाजप वेळोवेळी हे सरकार त्यांच्या कर्माने जाईल अशी प्रतिक्रिया देत आहे, त्याला वेळोवेळी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रत्युतर देण्यात येत आहे.

मला भाजप आणि फडणवीसांना विचारायचे आहे की केंद्र सरकारने जो टॅक्स डिझेल आणि पेट्रोलवर लावला आहे त्याची माहिती जनतेला द्यावी आणि मगच त्यांनी मोर्चे काढावे. महाविकास आघाडी सरकारने कोणतेही कर वाढवले नाहीत. हे फडणवीस यांच्या काळात लावलेले कर आहेत. केंद्र सरकारविरोधात महागाईची लाट आहे, हे आलेलं संकटं राज्याच्या सरकारवर लोटण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here