काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
आयटी पार्कातील कार्यालयात घुसून दमदाटी केल्याचाही आरोप..
अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव काळे यांच्यासह आठ ते दहा जनांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात; विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणास्तव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.काय आहे प्रकरण-काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत एमआयडीसी येथील आयटी पार्कला नुकतीच भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील बजाज फायनान्स, बजाज फिन्सर कंपनीचे कॉल सेंटर इथे बळजबरीने प्रवेश करून येथील तक्रारदार महिलेचा हाथ पकडून ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच कार्यालयातील महिलांना दमदाटी करत मी काँग्रेस पक्षाचा शहर जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्या नादी लागू नका, सगळे धंदे बंद करा, मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. या तक्रारी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आई.पी.सी.कलम 452, 354,504,506 नुसार किरण गुलाबराव काळे आणि इतर आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.





