काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली ! : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

573

ट्विटरच्या पक्षपाती कारवाईचा निषेध, दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही.

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहिल.

मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२१

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद केल्यानंतर आता अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत. ट्विटरची ही कारवाई पक्षपातीपणाची असून केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्विट करून जेरीस आणल्यामुळेच मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटरने ही कारवाई केली आहे. या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून कोणत्याही दबावापुढे न झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवतच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

ट्विटरच्या कारवाईवर बोलताना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार लोकशाही व्यवस्था व संविधानाला न जुमानत हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून केंद्र सरकारच्या विरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न मगील ७ वर्षापासून सातत्याने केला जात आहे. संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. अन्याय, अत्याचार दिसेल त्याविरोधात आम्ही आवाज उठवत आलो आहोत व यापुढेही आवाज उठवत राहु. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अन्यायी कारभाराचे वाभाडे काढत होते तेच त्यांना अडचणीचे ठरल्याने कारवाई केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार समाजात तेढ निर्माण करणारे, फुट पाडणारे, देशविघातक संदेश ट्विटरवरून देत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत ट्विटर करत नाही मात्र थातुरमातूर कारणे देऊन काँग्रेसच्या शेकडो ट्विटर खात्यांवर कारवाई करण्यात आली हा पक्षपातीपणा आहे.

ट्टिटरने अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष, मुंबई काँग्रेस, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, जितेंद्र सिंह, महिला काँग्रेसच्या सुष्मिता देव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस व सोशल मीडियाचे अभिजित सपकाळ यांच्यासह काँग्रेसची शेकडो खाती बंद केली आहेत. ट्विटरने कितीही खाती बंद केली तरी संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यापासून कोणीही रोखू करु शकत नाही, असेही पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here