कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार अन् राज्य शासनात विलीनीकरणही होणार; गुणरत्न सदावर्ते यांचे आश्वासन

366

पुणे : आपली कुठली युनियन नाही, ना आपण कोणता संप करीत आहोत. आपली मन:स्थिती ठीक नाही. प्रकृती अत्यावस्थ आहे. ५२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचा हा दुखवटा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन तर मिळेलच शिवाय एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण देखील होईल, असे आश्वासन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिले.

रविवारी रात्री स्वारगेट बस स्थानक येथे येऊन आंदोलक एस.टी. कर्मचाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जयश्री पाटील या देखील होत्या. 

उपस्थित एस.टी. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सदावर्ते म्हणाले, आपली युनियन नाही. त्यामुळे आपण कोणता संप करीत नाही. ही भारत जोडोची लढाई आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना आधी निलंबनाची धमकी दिली. त्यानंतर बडतर्फ आणि आता मेस्मा लावण्याची धमकी देत आहे; पण कर्मचाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. भारतीय संविधानात असे लिहिले आहे. जर मन:स्थिती ठीक नसेल अशा वेळी कर्मचारी कामावर गेला नाही, तर त्याला त्याचे वेतन द्यावेच लागते. तसेच निलंबित कर्मचाऱ्यांना देखील त्यांचा निर्वाह भत्तादेखील द्यावा लागतो. ही कायद्यातीलच तरतूद आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. येणाऱ्या काळात एस.टी.चे विलीनीकरण होणार व संविधान जिंकणार, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here