करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुठल्याही गणपतीच्या दर्शनाची परवानगी नाही – अजित पवार

1103
पुण्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांना दिल्या सूचना

पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी करोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये. ‘करोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात दिल्या. विधानभवनात पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील करोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देऊन काम करावे. तसेच करोनाबरोबरच पावसाळयातील अन्य संसर्गाचे आजार व सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”

करोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरु होऊन गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे सांगून पुणे मेट्रोसह जिल्हयातील महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेश विसर्जनाबाबत सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलीस विभाग व महापालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची करोनाबाधित रुग्णांची सद्यस्थिती, करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी, तपासण्यात आलेल्या बिलांचे व्यवस्थापन, बेड व्यवस्थापन आदी विषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील ‘कोरोना’ स्थितीची माहिती दिली. ‘आयसर’चे अर्नब घोष व डॉ. आरती नगरकर यांनी करोनाविषयी यावेळी सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here