कमी मार्क मिळाल्याने शिक्षक पित्याची पोटच्या मुलीला बेदम मारहाण, मुलीचा दुर्दैवी मृत्यू

    98

    सांगली – ‘नीट’ च्या चाचणी परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने शिक्षक असलेल्या बापाने पोटच्या मुलीला दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सांगलीच्या आटपाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी साधना ही आटपाडीत बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती. दहावीत तिने ९२.६० टक्के गुण मिळवले होते. गावातील शाळेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुलीकडून धोंडीराम भोसले यांना फार अपेक्षा होत्या. यामुळे तिला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे प्रयत्न सुरु होते. पण नीट च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने ते संतापले.धोंडीराम भोसले नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षत असून, पत्नी प्रिती गावच्या माजी सरपंच आहेत.

    धोंडीराम यांनी शुक्रवारी घरी आल्यानंतर मुलगी साधनाला कमी गुण मिळाल्याचे कारण विचारले. मी तुझ्यासाठी इतका खर्च करतोय? तू कशी डॉक्टर होणार? असा जाब त्यांनी विचारला. यादरम्यान साधनानेही त्यांना उलट उत्तर देत, ‘पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते. तुम्ही कुठे कलेक्टर झालात? शिक्षकच झालात’ असे म्हटले. मुलीने उलट उत्तर दिल्याने धोंडीराम चिडले आणि दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली.

    धोंडीराम यांनी मुलीच्या पोटात लाथाही मारल्या. पत्नीने मध्यस्थी केल्यानंतर अखेर ते थांबले होते. पण काही वेळाने त्यांनी पुन्हा एकदा साधनाला मारहाण केली. या मारहाणीत तिला गंभीर इजा झाल्या होत्या. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे वडील योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

    दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता घटना उघडकीस आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. साधनाची आई प्रिती यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर धोंडीराम भोसलेंना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here