कंगना रानौतच म्हणाली होती ‘ उखाड लो ‘ आम्ही केवळ तिच्या इच्छेचा मान राखला : संजय राऊत
अभिनेत्री कंगना रानौत हिनेच मुंबई महानगरपालिकेला ‘मी येते, तुम्हाला जे उखडायचेय ते उखाडा’, असे आव्हान दिले होते. एक महिला म्हणून मुंबई महानगरपालिकेने तिच्या इच्छेचा मान ठेवला आणि तिचे अनधिकृत कार्यालय पाडले, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबई महापालिकेने कंगनाचे कार्यालय पाडल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये ‘उखाड दिया’, अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. ही ‘सामना’ची स्टाईल आहे, त्यामध्ये काहीही चूक नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतला चांगलेच चिमटे काढले आहे . संजय राऊत यांनी या मुलाखतीदरम्यान राज्यातील इतरही प्रश्नांवर चांगलीच फटकेबाजी केली.
कंगनाच्या अनधिकृत कार्यालयाचे बांधकाम पाडणाऱ्या जेसीबीला पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे, असे मी ऐकले आहे. हा जेसीबी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी उपयोगी पडतो. केवळ कंगना रानौतच्या कार्यालयावरच कारवाई झाली असे नव्हे. मुंबईत अनेक ठिकाणी अवैध बांधकामे आहेत. त्या सगळ्यांविरोधात मुंबई महानगरपालिका कारवाई करते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.