औरंगाबाद शहरात मागील काही दिवसापासून दररोज १०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे .
हा आकडा कमी होण्यापेक्षा वाढतच असल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे .
दिवाळीच्या अगोदर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास आरोग्य विभागाला यश मिळाले होते . पण खरेदीसाठी अलोट गर्दी बाजारपेठेत झाली होती . दिवाळी अगोदर दररोज 60 च्या आतच कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांसह आरोग्य विभागाला दिलासा मिळाला होता .
मात्र दिवाळी सणासाठी बाजारपेठेत उसळलेली गर्दी , मास्कचा न होणारा वापर , सोशल डिस्टंसिंगचे न होणारे पालन यामुळे कोरोना वाढण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली होती . दिवाळी होताच त्याचे परिणाम आता दिसून येत आहे . गेल्या चार दिवसापासून कोरोना रुग्णांचा आकडा शंभरच्या वर गेला आहे .
रविवार 113 पैकी 101 ,
सोमवार 141 पैकी 125 ,
मंगळवार 146 पैकी 124 ,
बुधवार 111 पैकी 89 ,
गुरुवार 127 कोरोनाचे रुग्ण मनपा हद्दीत आढळून आले आहे व उर्वरित रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले.
एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला असला तरी अद्याप दुसरी लाट आलेली नाही . कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज आहे . विविध उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे .
ज्यांना ताप ,
सर्दी , खोकला आला असेल त्या नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा , तीन – चार दिवस हा आजार राहत असेल तर कोरोनाची चाचणी करुन घ्यावी .
शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे असे आवाहन डॉ . निता पाडळकर यांनी केले आहे