औरंगाबाद : पत्नी, मुलीची जबाबदारी झटकणाऱ्या पतीला कौटूंबिक न्यायालयाने चांगलाच दणका दिला. पतीने स्वतःचे आर्थिक स्त्रोत लपवून पत्नी, पाच वर्षांच्या मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी झटकल्याप्रकरणात कौटूंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आशिष अयाचित यांनी पतीला दोषी ठरवत मुलगी तनिष्का व पत्नी पूजा यांना पती अजय सोनवणे यांनी प्रत्येकी मासिक साडेसात हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेश दिले.पत्नी सध्या मुलीसह माहेरी राहते.
त्यांना दाव्याच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी औरंगाबादच्या हनुमाननगरातील गुरुकृपा ज्वेलर्सचे अजय बाबूराव सोनवणे आणि पूजा यांचा १५ मे २०१५ रोजी विवाह झाला होता.
१२ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांना मुलगी झाली. एकमेकांशी पटत नसल्याने दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.पत्नी पूजा मुलीच्या जन्मापासून माहेरी राहते. पुन्हा संसार सुरू करण्यासाठी त्याने कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते, तर पूजाने पोटगीचा दावा केला होता.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पत्नीच्या बाजूने ॲड. रमेश घोडके पाटील यांनी युक्तीवाद केला की, अजयने खोटे पुरावे देत कोर्टाची फसवणूक केली असून मुलीच्या जन्मापासून पतीने मुलगी, पत्नीच्या उदरनिर्वाहाची सोय केली नाही. पोटगीही दिली नाही असे म्हणणे मांडली.
दरम्यान ॲड. रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भाऊराव परळीकर विरुद्ध महाराष्ट्र शासन २००६ आणि दिलीपसिंग विरुद्ध स्टेट ऑफ यूपी २००९ या निवाड्या हवाला दिला.
सुनावणीअंती न्यायालयाने पत्नीस जिवंत असेपर्यंत व मुलीस सज्ञान होईपर्यंत प्रत्येकी साडेसात हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले.
तसेच इतर कलमांच्या आधारे पत्नीस भरपाईसाठी दावा दाखल करण्याची मुभा न्यायालयाने दिली. पत्नीच्या वतीने ॲड. रमेश घोडके पाटील यांनी बाजू मांडली.