ओमिक्रॉन विषाणूचा पनवेलमध्ये शिरकाव, 5 जणांना संसर्ग, पालिका अलर्टवर

383

पनवेल : राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबई उपनगरांतदेखील कोरोना प्रतिबंधक नियम कटाक्षाने पाळण्याचे नागरिकांना सांगितले जात आहे. असे असले तरी पनवेल महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉनचे पाच रूग्ण आढळले आहेत. पनवेलमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले असून वेगवेगळ्या उपायोजना आखल्या जात आहेत. तसेच ओमिक्रॉनबाधित रुग्णांवर रुग्णालय तसेच विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रात आज 27 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनबाधित पाच रूग्ण आढळले आहेत. यातील तीन रूग्ण हे परदेशी दौरा करून आलेले आहेत. तर उर्वरित दोन जण परदेशातून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्तीय आहेत. या सर्वांना ओमिक्रॉनी सौम्य स्वरुपाची लक्षणे असून त्यांच्यापासून संक्रमण वाढू नये, यासाठी त्यांना पालिकेने उभारलेल्या कळंबोली येथील सीसीआयच्या जंबो कोविड सेंटरमध्ये ओमिक्रॉन विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यातील एका रूग्णाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खारघर येथील चार रूग्ण ओमायक्रॉनने बाधित असून पाचवा रुग्ण पनवेल शहरातील एक नागरिक आहे. हे रूग्ण दक्षिण आफ्रिका, दुबई, USA येथून आले आहेत. सदर रूग्णांच्या सोसायट्या सील करण्यात आल्या आहेत. तसेच हा भाग कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सर्व परिस्थितीवरत महापालिका लक्ष ठेवून आहे. आत्तापर्यंत परदेशातून 2360 प्रवासी आले असून यातील 1389 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील 5 नागरिक ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत.

दरम्यान, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्देशानुसार पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिका क्षेत्रात काळजी, चाचणी, उपचार आणि विलगीकरण यावर भर दिला आहे. त्यासोबतच पालिका क्षेत्रात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली असून रात्री 9 ते सकाळी 6 सहा पर्यंत पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहेत. ओमायक्रॉनचे संक्रमण लक्षात घेता नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करू नयेत, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here