ऐनदिवाळीत गावात उडाली खळबळ
एकाचवेळी ५४ बाधित
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झालेले असताना नगर तालुक्यात अकोळनेर येथे ५४ कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली.
ऐन दिवाळीत गाव बंद ठेवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. गावातील एका मठामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र आल्यामुळे हा फैलाव झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आजतागायत नगर तालुक्यात कोरोनाचे ३ हजार २०६ रुग्ण आढळून आले असून आजमितीला १८७ रुग्ण उपचार घेत आहेत. पण त्यातील ५४ रुग्ण हे एकट्या अकोळनेर गावातील आहेत.
ग्रामीण भागातील लोकांच्या मनातील कोरोनाची भीती निघून गेल्याचे दिसत असून सर्व व्यवहार राजरोस आणि मास्कविना सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी कोजागिरी पौर्णिमा झाली.
अकोळनेरमधील एका मठामध्ये भजन संध्येच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झाले होते.
या कार्यक्रमानंतर एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने चास येथील तपासणी शिबिरात जाऊन तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला.
त्याने सांगितलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाला संशय आल्याने आरोग्य विभागाने गावात तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात संशयित २७८ रुग्णांची तपासणी केली असता त्यातील ५४ जण बाधित आढळून आले.
गावात अचानक एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली. अकोळनेर गाव बंद करण्यात आले असून ऐन दिवाळीत गाव बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली.
ग्रामीण भागात कोरोनाबाबत आढळणारा निष्काळजीपणा याला कारणीभूत ठरला असून कोजागिरी पौर्णिमेची भजन संध्या गावाला महागात पडल्याची चर्चा आहे