
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. कालच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 38 टक्क्यांवरून 42 टक्के देण्यात येणार आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांची जी थकबाकी आहे, त्यासंदर्भात 15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. बैठकीच्या शेवटी उपोषण समाप्त करण्याबाबत आवाहन करण्यात आले व संघटनेच्या प्रतिनिधींनी उपोषण मागे घेण्याबाबत सहमती दर्शविली.