एम‌‌.के. कंपनीचा म्होरक्या कुख्यात गुन्हेगार मंगेश कदम हवेली पोलीसांना शरण

    एम‌‌.के. कंपनीचा म्होरक्या कुख्यात गुन्हेगार मंगेश कदम हवेली पोलीसांना शरण

    किरकटवाडी : खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत निर्माण करणे, बेकायदा जमाव जमविणे, खंडणी असे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेला एम.के. कंपनीचा म्होरक्या कुख्यात गुन्हेगार मंगेश उर्फ भाईजी कदम (रा. माऊली अपार्टमेंट, धायरी मुळ रा. नांदोशी ता. हवेली जि. पुणे) अखेर हवेली पोलीसांना शरण आला आहे. हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधु यांनी या गुन्हेगाराला पकडण्यासाठी युद्धपातळीवर केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.
    सुमारे तीन वर्षांपूर्वी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धायरी येथील सराईत गुन्हेगार हसन शेख याचा खुन करण्यात आला होता. त्याचा आरोप मंगेश कदम व टोळीवर ठेवून सर्वांवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून मंगेश कदम फरार होता. हवेली व सासवड पोलीस ठाणे, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, शहराची गुन्हे शाखा, एटीएस पथक अशा सर्वांकडून कदमला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते परंतु मोबाईलचा वापर न करणे व सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलणे अशा कारणांमुळे तो कोणाच्याही हाती लागत नव्हता.वडीलोपार्जित जमीनीच्या वादातून मंगेश कदम याने खडकवासला येथील एका व्यावसायिकाला खंडणी मागीतल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधु यांनी कदमच्या संपर्कात असणाऱ्या हद्दीतील इतरांची माहीती काढून त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे दबाव वाढला व अगोदरच पोलीसांना शरण येण्याच्या प्रयत्नात असलेला मंगेश कदम हवेली पोलीसांकडे हजर झाला आहे. प्रभारी अधिकारी तेगबिरसिंह संधु यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार दिनेश कोळेकर, निलेश राणे, विलास प्रधान, रामदास बाबर, पोलीस नाईक राजेंद्र मुंढे व कॉन्स्टेबल स्वप्नाली कोलते यांच्या पथकाने रात्री उशिरा मंगेश कदम याला ताब्यात घेण्याची कारवाई केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here