
पारनेर : मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) झालेल्या बैठकीत पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीसाठी 77 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे यांनी दिली आहे.
सुपे एमआयडीसीच्या सुरक्षततेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी सह, अग्नीशमन ( फायर) स्टेशन साठी 50 कोटी, जुनी एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांसाठी 25 कोटी तसेच नवीन एमआयडीसीसाठी प्रवेशद्वार अडीच कोटी असे एकूण 77 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
एमआयडीसीसाठी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी रहिवासी (हाऊसिंग ) फ्लॉटही व वसाहत उभारण्याचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीत झाला. तसेच कामगारांना सुपे एमआयडीसीत ये-जा सुलभ व्हावे या साठी लवकरच नगर, शिरूर व पारनेर येथून सुपे येथे शटल बस सुरू करण्यात येणार आहे. सुपे एमआयडीसीत उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी सर्वप्रकारची कागदपत्रे सुलभ तातडीने मिळावीत या साठी नगर येथे एक खिडकी योजणा सुरू करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी लागणारी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळण्याची सोय करण्यात येणार आहे. नवीन एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस चौकीही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सुपे एमआयडीसी जुनी व नवीन या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे टपऱ्या उभारल्या आहेत. लवकरच दोन्ही ठिकाणावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
एमआयडीसी च्या विविध विकास कामांसाठी सुपेचे माजी उपसरपंच सागर मैड व सरपंच मनीषा रोकडे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली होती आपण खासदार डॉ.सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे राहुल शिंदे यांनी सांगितले.
या बैठकीला उद्योगमंत्री सामंत व पालमंत्री विखे पाटील यांच्यासह खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत माने, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जिल्हा परिषदेचे जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
सुपा एमआयडीसी जागतिक दर्जाची मोठी एमआयडीसी झाली आहे. सुप्याचे नाव त्यामुळे जागतिक पातळीवर पोहोचले आहे. उद्योग व व्यावसायिक वाढण्यासाठी येथे स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी आपण वेळोवेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. त्यांनीही त्याची दखल घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबत बैठक लावून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
राहुल शिंदे
जलसंधारण समिती सदस्य, जिल्हा परिषद, नगर.