
नगर : भारताने काही दिवसापूर्वी चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. यामध्ये अनेक तज्ज्ञांनी महत्वाची भूमिका बजावली. भारताच्या चंद्रयान ३ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञ एन. वलारमथी (N Valarmathi) यांचं वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं आहे. शनिवारी (ता. २) संध्याकाळी चेन्नईमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. इस्रोच्या चंद्रयान-3 (Chandrayaan 3) मिशन लाँचच्या काऊंडाऊन मागील आवाज हा त्यांचा होता. १४ जुलै रोजी प्रक्षेपित केलेलं चंद्रयान – 3 हे त्यांच्यासाठी अंतिम काउंटडाउन ठरलं आहे.
शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इस्रोच्या मोहिमांच्या लाँचिंगचं काऊंटडाऊन देणाऱ्या एन. वलारमथी यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटल्याचं राजीव चंद्रशेखर म्हणाले. इस्रोच्या माजी संचालकांनीही एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एन. वलारमथी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना इस्रोचे माजी संचालक डॉ. पीव्ही व्यंकट कृष्णन म्हणाले, “चांद्रयान-3 ही त्यांची अंतिम काऊंटडाऊन घोषणा होती. एक अनपेक्षित मृत्यू. खूप वाईट वाटतंय, प्रणाम!”
एन. वलारमथी या गेल्या सहा वर्षांपासून सर्व लाँचसाठी काऊंटडाऊन घोषणा करत होत्या.शनिवारी (ता.3) संध्याकाळी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंआहे. त्या काही काळापासून अस्वस्थ होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने इस्रोमधील शास्त्रज्ञ दुःख व्यक्त करत आहेत.