Covid-19 : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे कोरोनाचा नवीन व्हेरियंट(Omicron Varient). ओमायक्रॉन हा कोरोनाचा एक व्हेरियंट आहे, जो लस घेतलेल्या किंवा पूर्वीच्या संसर्गातून मिळालेल्या अँटीबॉडीज असणाऱ्याला देखील संक्रमित करत आहे. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये एकाच व्यक्तीला डेल्टा व्हेरियंट दोनदा फटका बसल्याचे दिसून आले आहे. पण Omicron देखील एकाच व्यक्तीला दोनदा संक्रमित करू शकतो का? चला जाणून घेऊया…
एखाद्या व्यक्तीला पुन्हा कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. परंतु, ओमायक्रॉनची अशी प्रकरणे आतापर्यंत नोंदवली गेली नाहीत. पण, ओमायक्रॉनमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा व्हेरियंटपेक्षा 4 पट जास्त आहे. ओमायक्रॉनमध्ये रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्याची क्षमता असल्याने, तो पुन्हा संक्रमणास कारणीभूत ठरतो आहे. याचाच अर्थ असा की, ज्यांना याआधी संसर्ग झाला आहे आणि ज्यांना अँटीबॉडीज आहेत किंवा ज्यांना लसीकरण करण्यात आले आहे, त्यांना देखील ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो. ओमायक्रॉनच्या स्पाईक प्रोटीनमध्ये 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन आहेत, जे त्याला प्रतिकारशक्तीवर मात करण्यास मदत करतात. त्यामुळे ज्यांना आधीच अँटीबॉडीज आहेत, अशा लोकांनाही ओमायक्रॉन संक्रमण होत आहे.






