
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं होतं. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे बंद आहेत का? याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे यांनी सूचक भाष्य केलं. ‘मातोश्रीवरील टीका करणं बंद करा, तर मातोश्रीचे दरवाजे उघडतील’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस काल एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की, महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी जर मला चहा प्यायला बोलावलं तर मी जाईन किंवा ते माझ्या घरी येतील. मात्र, उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी २०१९ मध्येच बंद केले आहेत, असं फडणवीस यांनी म्हटल्याबाबतचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.
या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “असं अजिबात झालेलं नाही. एवढी माणुसकी विसरणारा मी नाही. मात्र, तुम्ही मातोश्री बदनाम करण्यासाठी निघाला आहात. तुम्ही मातोश्रीवर वाट्टेल ते आरोप करता. ते तोंड तुम्ही बंद करा, मग ‘मातोश्री’चे दरवाजे उघडतील”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
“मातोश्री’चे दरवाजे उघडतील हे मी एवढ्यासाठीच म्हणत आहे की त्यांनी बकवास करणं बंद करावं. मातोश्रीला बदनाम करण्याचं काम बंद करावं, आमची कौटुंबिक बदनामी देखील बंद करावी, कारण मी कधीही कोणाची कौटुंबिक बदनामी केली नाही. माझ्याकडे माहिती असून देखील मी कोणाची कौटुंबिक बदनामी केली नाही आणि कधी करणार देखील नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.






