उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका : देवेंद्र फडणवीस

608

आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका किंवा गाफील राहू नका, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला. सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. राज्यातील 3 कोटींपेक्षा जास्त जनता ही सरकारी योजनांची लाभार्थी आहे. त्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार पु्न्हा येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. त्यामुळे राज्यात आपलेच सरकार येईल, अशी परिस्थिती आहे. पण अती आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

भाजप महान भारताच्या रचनेसाठी राजकारणात: अमित शाह
या मेळाव्यात भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाचा इतिहास आणि निस्पृह वृत्तीविषयी सांगितले. लोकसभेत आपल्याला फक्त 2 जागा होत्या, त्यावेळीही आपला एक कार्यकर्ताही आपला पक्ष सोडून गेला नाही. हा आपला इतिहास आहे.

ऐंशीच्या दशकातील कार्यकर्त्यांना माहिती असायचे, आपण निवडणूक हरणार आहोत, तरीही काळजी नव्हती. आपण राजकारणात महान भारताच्या रचनेसाठी आलो आहोत, पंतप्रधान किंवा कुठल्याही पदासाठी नव्हे. सरकार येते व जाते, पक्ष निती व विचार सोडतात, आपले सरकार १० वर्षे चालले पण आपण विचार किंवा निती सोडली नाही.

काश्मीर आपला आहे हे, विरोधात असतानाही आपण बोलत होतो. तेव्हा आपले सरकार येईल असे कुणाला वाटले होते का? पण आपले सरकार आले व कलम 370 आपण हटवले. राम मंदिर होईल असे कुणाला वाटले होते का? पण भूमिपूजन नव्हे तर मंदिर पण तयार केले. आज ‘जय श्रीराम’ हक्काने बोलत आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here