उत्तर प्रदेशातून गंगा उलटी वाहणार…शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करली तसेच मिश्रांबाबत होणार, राऊतांचा घणाघात…

495

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातून (UP election) गंगा उलटी वाहणार. कोलकाताच्या कालच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीतही परिवर्तनाचे वारे वाहतील. केंद्र सरकारला जशी शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली, अगदी तसेच मंत्री अजय मिश्रांच्या राजीनाम्याबाबत होईल, असे भाकित बुधवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्रे हलत आहेत, या आरोपाचा पुनरुच्चाही त्यांनी यावेळी केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातल्या विरोधी पक्षावर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करतंय. हे चंद्रकांत पाटलांना माहिती आहे. त्यांनी विरोधी पक्षाचं काम करावं, असा चिमटा त्यांनी काढला.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा नियम बदल्यावरुन टीका होत असेल, तर आम्ही तो धडा केंद्र सरकारकडून घेतलाय. मोदी सरकारच्या पावलावर आम्ही काही गोष्टींसाठी पाऊल टाकत आहोत, अशा शब्दांत त्यांनी भाजपला उत्तर दिले. केंद्र सरकारनं ओमिक्रॉनसंदर्भात सूचना दिल्या आहेत. केंद्रांच्या सूचनाप्रमाणं अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आलाय. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का? असा सवालही त्यांनी केला.

संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्र हालत असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्रास होणार हे गृहीत धरलं आहे. जया बच्चन यांची सूनबाई आणि लेकासंदर्भात वाचलं आहे. जे सरकारला प्रश्न विचारतील त्यांना त्रास दिला जाईल. हे 2024 पर्यंत सुरू राहील. मात्र, 2024 पासून उलटी गंगा वाहयला सुरुवात होईल, असं भाकितही राऊत यांनी वर्तवलं.

लखीमपूर खेरीप्रकरणी आम्ही काल मार्च काढला होता. राहुल गांधी यांनी सांगितलं की काही झालं तरी आम्ही त्या मंत्र्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास पाहता उत्तर प्रदेशात सत्ताबदल होतोय, त्यापाठोपाठ केंद्रातही सत्ता बदल होणार आहे. उत्तर प्रदेशात राजकीय परिवर्तन होईल, असं वातावरण आहे. उत्तर प्रदेशातून गंगा उलटी  वाहणार आहे. कोलकाताच्या कालच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीतही परिवर्तनाचे वारे वाहतील. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामुळे बंगालसारखे तिथे आठ-आठ दिवस तळ ठोकून बसले आहेत. मात्र, त्याचा काही उपयोग होणार नाही. केंद्र सरकारला जशी शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली, अगदी तसेच मंत्री मिश्रांच्या राजीनाम्याबाबत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here