लखनऊ : उत्तर प्रदेशमधील हाथसर येथे दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार 20 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिल्लीतील रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु होते. शरिरावर जखमा आणि ठिकठिकाणी फ्रॅक्चर्स झाल्याने मुलगी उपचारास प्रतिसाद देऊ शकली नसल्याचं सांगितलं जात आहे.
दिल्लीपासून सुमारे 200 किमीवर असलेल्या हाथसर गावात मुलीवर 14 सप्टेंबरला चार ते पाच जणांनी बलात्कार केला. तसा आरोप मुलीच्या भावाने केला होता. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.
पीडित मुलीच्या भावाच्या म्हणण्यानुसार, “माझा मोठा भाऊ, आई आणि बहीण शेतात गेले होते. माझा भाऊ गुरांसाठी चारा घेऊन समोर आला. माझी आई आणि बहीण काम करत होते. त्याचवेळी चार ते पाच जण गुपचूप आले. त्यांनी माझ्या बहिणीच्या गळ्यात ओढणी टाकून तिला शेजारच्या शेतात जबरदस्तीने घेऊन गेले. माझी बहीण गायब असल्याचे कळताच माझ्या आईने तिचा शोध घेतला. पण ती शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचे माझ्या आईला समजले.”
पोलिसांनी मदत न केल्याचा मुलीच्या भावाचा आरोप
मुलीच्या भावाने उत्तर प्रदेश पोलिसांनी मदत न केल्याचा आरोप केला आहे. आम्ही तक्रार करायला गेलो असताना पोलिसांनी आमची तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचं मुलीच्या भावाने सांगितलं. तसेच तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता पोलीस शांत बसल्याचं भावाने सांगितले. यंत्रणेवर दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी उशिराने कारवाई सुरु केल्याचा आरोपही पीडित मुलीच्या भावाने केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी मुलीच्या भावाने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलीस अधिकारी प्रकाश कुमार यांनी व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात त्यांनी एका आरोपीला लवकर अटक केल्याचं म्हटलं आहे. बाकीच्या तीन आरोपींची नावं कळताच आम्ही त्यांनाही अटक केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.



